धुतल्या तांदळाचा “संजू”

डॉल्फिन भाऊ

समजा संजय दत्त टाडा न्यायालयाने दिलेल्या न्यायानुसार जेल मध्ये गेला नसता, आर्म्स ऍक्ट नुसार त्याला येरवड्यात 5 वर्ष राहावे लागले नसते तर त्याच्या आयुष्यावर राजकुमार हिराणीने चित्रपट काढला असता का? काय उत्तर द्याल यावर? संजय दत्त सारख्या व्यक्तिमत्वावर आताच्या घडीला चित्रपट तो ही चरित्रपट बनविण्याचा अट्टाहास राजकुमार हिरानीचा का होता यासाठी चित्रपट पाहायला तर लागेल. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर उद्या सलमान खान वर देखील चरित्रपट निघाला तरी त्याबद्ल वेगळं वाटून घेण्याची गरज नाही. आपल्याकडे अर्थकारनापुढे कशाचेही उदात्तीकरण केलं जाऊ शकते. आणि संजू तर मला काहीही म्हणा पण दहशतवादी म्हणू नका. हे सांगण्यात खर्ची पडला आहे.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7261ff3b-7b82-11e8-95df-73d30d304ea8′]

संजय दत्त मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेत वापरण्यात आलेलं आरडीएक्स किंवा एके 56 सारखी शस्त्रास्त्रे जवळ बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनविण्यात आली. शिक्षा भोगून आपल्या घरी आला असताना त्याचा एक मित्र त्याच्यासमोर त्याने लिहिलेलं संजू चे चरित्र समोर ठेवतो. बाबा (संजू) आपली तुलना बापू (महात्मा गांधी ) यांच्या बरोबर केलेली आवडत नाही. आणि तो ते पुस्तक फाडून टाकतो. पुढे त्याची बायको मान्यता (दिया मिर्जा) त्याला त्याच्यावरील आरोपाचे खंडन करण्याकरिता, जनमाणसात त्याची चांगली प्रतिमा तयार व्हावी यासाठी एखाद्या उत्तम लेखकाकडून चरित्र लिहून घेण्याचा सल्ला देते. व्हिया डियाज (अनुष्का शर्मा)या लेखिकेला मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्राहलयात संजू आपली स्टोरी सांगायला सुरुवात करतो. येथुन पुढे संजय दत्त या महान नायकाची विविध रूपे आपल्यासमोर यायला लागतात. सुनील दत्त आणि संजय दत्त(परेश रावल)सुरूवातीच्या काळात या बाप बेटयाचं फार जमलं नाही. अस चित्रपटात पाहायला मिळतं. आता चित्रपटाच्या शेवटी मी किती पितृभक्त आहे हे दाखविण्यासाठी हिराणी यांनी काही सिन खर्च केले आहेत. पण वास्तवात संजय दत्त याला वेगवेगळ्या आरोपातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी प्रचंड कष्ट घेतले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्याच्यासाठी खूप मनस्ताप देखील सोसला.आपल्या नाठाळ मुलाला जागेवर आणण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व केलं मात्र संजू च्या नशिबी चरस, गांजा, अफू, एल एस डी, याचे झुरके होते. मद्याच्या बाटल्या होत्या. आणि शेकडोवारी गर्लफ्रेंड होत्या. तसे तो सांगतोही..वेश्या आणि इतर मैत्रिणी धरून माझ्या गर्लफ्रेंड चा आकडा हा किमान 350 तरी पकडावा. यावरून तो किती मस्तीखोर होता याची कल्पना सुजाण रसिकांना यावी.

[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7261ff3b-7b82-11e8-95df-73d30d304ea8′]

संजू बाबाचे जेलमध्ये जाणे, त्याचे नशेच्या आहारी जाणे, वडील,बहिणी यांच्या सोबतचे त्याचे नातेसबंध, आई आणि संजू असे वेगवेगळे पैलू संजू या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर येतात. परंतु संजू आणि त्याच्या बहिणी याबाबत एकही संवाद चित्रपटात नाही. आई बरोबर देखील त्याचे फारसे दृश्य नाही. थोडक्यात त्याचे सारे आयुष्य हे बाहेरच्या जगतातच गेले. मित्र परिवार मोठा होता. व्यसनी होता. कुसंगती हे त्याच्या आयुष्याला लागलेलं मोठं ग्रहण म्हणता येईल. त्यातून तो काहिकेल्या लवकर बाहेर न आल्याने त्याला आयुष्यातील अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. अर्थात यासगळ्याला तो जबाबदार होता. संजू हा चित्रपट खूपच एकांगी वाटतो. यात केवळ संजू पूर्वी किती का वाईट असेना परंतु आता त्याला स्वीकारा अशा पद्धतीने तो समोर आला गेला आहे. बर ते असेना का, पण संजय दत्त हा दोषी आहे याचे कारण माध्यमावर फोडण्यात आले आहे. स्वतः संजय दत्त, त्यांचे वडील सुनील दत्त यांचे म्हणणे असे की, पत्रकारांना प्रत्येक बातमीच्या पुढे प्रश्नचिन्ह चिटकविण्याची घाई झालेली असते त्यामुळे ते कुठलीही बातमी केवळ सूत्रांच्या आधारे, अशी अफवा, चर्चा, आहे या शब्दांचा वापर करून खोट्या बातम्या देण्याचे काम माध्यमे करत असल्याचे दोन्ही पिता पुत्र सांगतात. तेव्हा कोण कोणास सांगे? असे वाटायला लागते.

बाकी संजूच्या अभिनय करणाऱ्या रणबीर कपूर ला हॅट्स ऑफ करावे लागेल. इतका सुंदर अभिनय त्याने केला आहे. त्याने त्यासाठी घेतलेले परिश्रम देखील दिसून येतात. बहुरूपी संजू त्याने ज्या ताकदीने उभा केला आहे त्याला तोड नाही. रणबीर च्या करिअर साठी हा बायोपिक महत्त्वाचा ठरेल. बाकी छायाचित्रण, गाणी, संगीत ठाकठीक आहे. त्यात ऑसम, सुपरब असे काही नाही. संजू प्रेमींना तर विशेष सांगण्यासारखे काही नाही. ते तर न सांगता संजू पाहतील. इतरांनी रणबीरसाठी संजू बघावा. संजय दत्त साठी पाहिला गेल्यास सगळंच आलबेल वाटेल. हिरानी यांना पुढच्या आणखी एका बायोपिकसाठी शुभेच्छा…

या चित्रपटासाठी अडीच स्टार