‘सारथी’ संस्थेबाहेर आत्मदहनाचा इशारा, तारादुतांनी दिले ‘सारथी’ला निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेंतर्गत (सारथी) स्थगित केलेला तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून तारादूत पुण्यात सारथीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची अद्याप कोणतीच दखल घेतली जात नसल्याने येत्या दोन दिवसात आत्मदहन करण्यात येईल, अशा इशारा तारादुत मुकेश डुचे आणि सुरेश म्हस्के यांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या मुलांना स्पर्धा परीक्षा, निमलष्करी दलातील भरती, बँकिंगच्या परीक्षांबाबत माहिती देण्याचे काम तारादूत करतात. मात्र, हा प्रकल्पच स्थगित करण्यात आला असून, सारथीच्या योजना केवळ कागदावरच सुरू आहेत. तारादूत प्रकल्प सुरू करावा या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सुरु असून सारथीकडून अद्याप कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास सारथी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करण्यात येईल. याबाबतचे निवेदन सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक यांना ही देण्यात आले असल्याचे तारादुतांनी सांगितले.