कर्‍हाडमधील वाहतूक शाखेचा ‘कारभार’ पहिल्यांदाच महिला अधिकार्‍याच्या हाती

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या वाहतूक शाखेवर सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. त्यामुळे अखेर वाहतूक शाखेस अधिकारी मिळाला आहे.

एक अधिकारी व ४३ कर्मचारी कार्यरत असणाऱ्या शहर पोलीस ठाण्याची वाहतूक शाखा स्वतंत्र आहे. तत्पूर्वी, येथे कार्यरत असलेले फौजदार विकास बडवे यांची कोल्हापूरला बदली झाल्याने ते पद रिकामे होते. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. मात्र, त्यामुळे त्यांना बरीच कसरत करावी लागली.

दरम्यान, राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक असल्याने आचारसंहिता लागू होती. त्याच पार्श्वभूमीवर काही काळ नेमणुकांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता आचारसंहिता संपताच काही नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात कऱ्हाड मधील वाहतूक शाखेचाही समावेश होता. त्यावर सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांची नियुक्त करण्यात आली. त्यांनी अलीकडेच आपला पदभार स्वीकारला आहे. शहरातील वाढती वाहतूक समस्या, पार्किंग असे बरेचसे मुद्दे समोर आहेत. त्यात प्रथमच एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने, ते आव्हान कसे पेलतात हे पाहावे लागणार आहे.