Satara : आणखी एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्‍टरला पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आणखी एका बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश केला. त्या बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी (दि. 21) अटक केली आहे. तपासात दुसराही डॉक्‍टर बोगस आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय 26, रा. रेठरे खुर्द ता. कराड) असे अटक केलेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काले विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. आरोग्य विभागाला शंका आल्याने याची माहिती घेतली असता कोरोना बाधित रुग्ण नारायणवाडीतील पंत क्लिनिकमधून उपचार घेत असल्याचे समोर आले. संबंधित दवाखान्याची माहिती आरोग्य विभागाने घेतली. त्यावेळी सुवर्णा प्रताप मोहिते (रा. रेठरे खुर्द) ही रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर आले. संबंधित महिला डॉक्टर नसतानाही रुग्णांवर उपचार करीत होती. आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी त्याठिकाणी छापा टाकून सुवर्णा मोहितेला अटक केली होती. याच दवाखान्याच्या माध्यमातून सुदर्शन जाधव हा देखील रुग्णावर उपचार करत असल्याची माहिती तपासात समोर आली. जाधव हा फार्मासिस्ट असल्याचे सांगत आहे. मात्र, त्याबाबतही पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाते तपास करीत आहेत.