पुणे- सातारा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे ते शेंद्रे रस्त्याची गुणवत्ता वाढविणार आहे. त्याशिवाय शेंद्रे ते कागल रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच मार्गी लावणार आहे. तसेच कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्‍यावर लवकरच उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्याचे काम त्वरित सुरू होणार असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्या वेळी जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विविध प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी खासदार पाटील यांनी पुणे ते शेंद्रे राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा निदर्शनास आणून दिली. तसेच त्याची तातडीने दुरुस्तीची मागणी केली. शेंद्रे ते कागल येथेही राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहा पदरीकरणाचे काम तातडीने मार्गी लावावे, त्यासह कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्‍यावर तीन पदरी पूल असल्यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी कोल्हापूर नाक्‍यावरील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणीही खासदार पाटील यांनी केली. त्यावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सदर कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार पाटील यांना दिले.