SBI, ICICI आणि HDFC बँकेचे ग्राहक असाल तर व्हा सावध, पुढच्या महिन्यापासून OTP येण्यास येऊ शकते अडचण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : येत्या काही दिवसांत बँक ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण, 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान, बँक शाखा केवळ दोन दिवसांसाठी खुल्या असतील. या कालावधीत केवळ 2 कार्य दिवस येत आहेत. संपूर्ण देशात 27, 28 आणि 29 मार्च रोजी बँका सलग तीन दिवस बंद राहतील.

27 मार्च रोजी चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. रविवारी 28 मार्च रोजी बँकांना सार्वजनिक सुट्टी आहे. 29 मार्च रोजी होळीची सुट्टी आहे. यानंतर पाटणा विभाग वगळता 30 मार्च रोजी बँका खुल्या राहतील. यानंतर 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकेच्या शाखांमध्ये सेवा उपलब्ध होणार नाहीत. 1 एप्रिल रोजी खाते बंद झाल्यामुळे शाखांमध्ये सेवा उपलब्ध होणार नाहीत. यानंतर 2 एप्रिल रोजी गुड फ्राइडेची सुट्टी आहे. 3 एप्रिलला बँकांमध्ये काम होणार असून दुसर्‍या दिवशी रविवारी पुन्हा बँकांच्या सुट्टीचा दिवस आहे. अशा प्रकारे, 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान केवळ 30 मार्च आणि 3 एप्रिलला शाखांमध्ये बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल.

त्याचबरोबर एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक या मोठ्या बँकांच्या ग्राहकांना पुढील महिन्यापासून आणखी एक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) शुक्रवारी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संदेशाबाबत नियामक निकषांची पूर्तता न करणाऱ्या 40 ‘डिफॉल्टर्स’ कंपन्यांची यादी जाहीर केली. ट्राय कडून या प्रमुख घटकांना बर्‍याच वेळा माहिती देण्यात आली आहे. यात एचडीएफसी बँक, भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.

ट्रायने 31 मार्च 2021 पर्यंत हे नियम पाळले पाहिजेत, असे नमूद करून या विषयावर कठोर भूमिका घेतली आहे. तसे नसल्यास, 1 एप्रिल 2021 पासून ग्राहकांशी त्यांच्या संवादात व्यत्यय येऊ शकतो. नियामकाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, “प्रमुख युनिट / टेल-मार्केटिंग कंपन्यांना नियामक आवश्यकता पूर्ण करण्याची पुरेशी संधी देण्यात आली आहे.” ग्राहकांना नियामक फायद्यांपासून आणखी दूर ठेवले जाऊ शकत नाहीत. असा निर्णय घेण्यात आला आहे की 1 एप्रिलपासून संदेश नियामक आवश्यकतांचे पालन न केल्यास ही यंत्रणा थांबविली जाईल.

दरम्यान, नियामकाने ग्राहकांना फ्रॉड एसएमएसपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने कर्मशियल मॅनेजवर आळा घालण्यासाठी एक प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये नियामकांनी कंपन्यांना ट्राय सह एसएमएस नोंदवण्यास सांगितले आहे जेणेकरून ग्राहकांना योग्य संदेश पोहोचू शकेल आणि ते कोणत्याही फसवणूकीला बळी पडू नयेत. अनेक कंपन्या नियामकाच्या या आदेशाकडे गांभीर्याने पहात नाहीत. याचा परिणाम कंपन्यांच्या दुर्लक्षाचा फटका ग्राहकांना सहन करावा लागू शकतो. अशा कंपन्यांनी ग्राहकांना पाठविलेले संदेश / ओटीपी वगैरे येत्या महिन्यापासून ट्रायच्या नव्या यंत्रणेद्वारे रिजेक्ट केले जाऊ शकतात.