सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण अभियानांतर्गत सामान्य जनतेला सोमवारपासून लस देण्यास सुरूवात होईल. सामान्य जनतेत 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त लोकांचा यामध्ये समावेश असेल. को-विन 2.0 पोर्टलसह आरोग्य सेतुवर सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कुणीही पात्र व्यक्ती लस घेण्यासाठी कुठूनही आणि कोणत्याही वेळी रजिस्ट्रेशन करू शकते. सकाळी नऊपासून दुपारी तीन वाजेपर्यंत लस दिली जाईल. Co-WIN ची वेबसाइट cowin.gov.in वर सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता.

मंत्रालयानुसार, 60 वर्ष किंवा ज्यांचे वय 1 जानेवारी 2022 ला 60 वर्ष असेल ते सुद्धा लस घेण्यास पात्र असतील. अशाच प्रकारे 20 प्रकारच्या गंभीर आजारांपैकी कोणत्याही एकाने ग्रस्त आणि 45 ते 59 वर्ष किंवा 1 जानेवारी 2022 पर्यंत या वयाचा असणारा व्यक्ती सुद्धा लस घेण्यास पात्र असेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) नुकतीच को-विन2.0 पोर्टलवर विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत नोंदणीकृत खासगी हॉस्पीटलसाठी आयोजित कार्यशाळेत ही सूचना दिली होती. या हॉस्पीटलमधून आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) अंतर्गत येणारी 10 हजार हॉस्पीटल, केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) पॅनलमध्ये सहभागी 600 पेक्षा जास्त हॉस्पीटल आणि राज्य सरकारांच्या आरोग्य विमा योजनांच्या पॅनलमध्ये सहभागी खासगी हॉस्पीटलचा समावेश होता.

को-विनवर 20 गंभीर आजार
कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेला डिजिटल प्लॅटफार्म को-विन2.0 वर एक नवीन फिचर देण्यात आले आहे, ज्यामध्ये 20 गंभीर प्रकारच्या आजरांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय लसीकरणानंतर लाभार्थ्यांमध्ये दिसून येणार्‍या प्रतिकूल प्रभावाच्या उपचाराबाबत सुद्धा खासगी हॉस्पीटलच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

150 रूपये लसीचे आणि 100 रूपये सर्व्हिस चार्ज
मंत्रालयाने सांगितले की, कुणीही व्यक्ती कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतो. सरकारी हॉस्पीटलमध्ये मोफत लस मिळेल, खासगी हॉस्पीटलमध्ये प्रत्येक डोससाठी 250 रुपये द्यावे लागतील. यामध्ये 150 रुपये लसीसाठी आणि 100 रुपये सर्व्हिस चार्ज असेल. लाभार्थी कोणत्याही एका वेळेसाठीच रजिस्ट्रेशन करून शकतो. पहिला डोस घेणारा व्यक्ती याच पोर्टलवर दुसर्‍या डोससाठी त्याच्या 29 व्या दिवशी बुकींग करू शकतो.

लसीकरण केंद्रावर सुद्धा रजिस्ट्रेशनची सुविधा
मंत्रालयानुसार, एखादी पात्र व्यक्ती जर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकत नसेल तर तो थेट लसीकरण केंद्रात जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतो. स्लॉट रिकामा झाल्यानंतर त्यास ताबडतोब लस सुद्धा दिली जाईल.