‘कोरोना’वरील लस घेतली अन् 10 दिवसानंतर 3 डॉक्टर पॉझिटिव्ह

शिमला : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लस निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. असे असताना कोरोनावरील लस घेतल्यानंतर 10 दिवसांतच 3 डॉक्टरांना कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठ्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या (IGMC) डॉक्टरांना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. आता दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनर्स यांना लस दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात कोरोनावरील लसीचे तब्बल 1.83 लाख डोस पोहोचले आहेत. पण याच लसीकरणानंतर 3 डॉक्टर कोरोनाबाधित आढळले असून, त्यांच्यामध्ये 10 दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसली. जेव्हा या डॉक्टरांची कोरोना टेस्ट केली, तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या तीनही डॉक्टरांना होम आयसोलेट करण्यात आले आहे.

याबाबत IGMC चे प्राचार्य डॉ. रजनीश पठानिया यांनी सांगितले, की ड्युटीच्या दरम्यान हे डॉक्टर्स कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यामुळेच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

लसीकरणाचा दुष्परिणाम नाही
कोरोनावरील लस घेतल्यानंतर 3-4 महिन्यानंतर आपल्या शरीरात एँटिबॉडिज् तयार होतात. हे तीनही डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे ते बाधित झाले आहेत. त्यामुळे लसीकरणाचा कोणताही परिणाम किंवा दुष्परिणाम यांचा काहीही संबंध नाही, असेही डॉ. पठानिया म्हणाले.