शिराळा एस.टी. आगारातील कावीळ बाधितांची संख्या ५७ वर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शिराळा एस. टी. आगारातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कावीळची लागण झाल्याने आता रुग्णाची संख्या ५७ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. फक्त एस टी कर्मचारी वर्गातच ही साथ असल्यामुळे या कार्यालयात पिण्यात येणारे पाणी दूषित असावे असा प्राथमिक अंदाज आहे. कर्मचारी संख्या कमी झाल्याने ४८६७ किलोमीटर च्या फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

या आगारात सध्या  १५ चालक , २५ वाहक तर वर्क शॉप मधील  १२ कर्मचारी असे एकूण ५२ कर्मचारी वर्गास कावीळ झाली आहे. यामध्ये मंगळवार रोजी तीन तर आज (बुधवार) दोन कर्मचारी रुग्णांची वाढ झाली आहे.

शिराळा आगाराच्या चाळीस पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कावीळची लागण

बस स्थानक व आगार परिसराला विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, विभागीय अभियंता एस. एस. शिंदे, डी. बी. कदम, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, नगरसेवक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष पाटील, आरोग्य परिवेक्षक एम. आर. उगारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र घड्याळे, आगार प्रमुख एस. बी. फरांडे, स्थानक प्रमुख धन्वंतरी ताटे यांनी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी अमृता ताम्हणकर यांनी तातडीने स्वच्छता तसेच पाण्याची टाकी ची योग्य ठिकाणी उभारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आज पाण्याच्या टाकीची तसेच नगरपंचायत नळ कनेक्शन ची दुरुस्ती, सांडपाणी निचरा व्यवस्थेची दुरुस्ती चालू करण्यात आली आहे.

यावेळी आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तसेच रक्ताचे नमुने घेतले असून ते मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे टाक्यांची स्वच्छता, दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर चालू झाले आहे.