पोस्टमॉर्टम नंतरही गावकऱ्यांकडून मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा प्रयत्न

ओडिशा : पोलीसनामा ऑनलाइन –   ओडिशातील नयागढ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आजही काही लोक अंधविश्वासाच्या बेड्यांमध्ये बांधले गेले आहेत. इथे गावातील लोकांनी एका मृत व्यक्तीला तंत्र-मंत्राने पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे या मृत व्यक्तीचं पोस्टमॉर्टमही झालं होतं. विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या या आधुनिक युगातही हैराण करणारी ही घटना नयागढ जिल्ह्यातील सारांकुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारासाही गावातील घडली आहे.

मृत व्यक्तीचं नाव राबी नाहक असं आहे. ४५ वर्षीय नाहकने स्थानिक उत्सव डांडा नाचामध्ये भाग घेतला होता. याच्याशी संबंधित परंपरेनुसार, नाहकने ३६ तास काहीच खाल्लं नव्हतं. दोन दिवसांआधी नाहक आजारी पडल्यावर त्याला जिल्हा मुख्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. हॉस्पिटल प्रोटोकॉनुसार, रविवारी त्याचं पोस्टमार्टेम झालं आणि त्याचा मृतदेह जवळच्या लोकांना सोपवण्यात आला. मृतदेह गावात नेण्यात आला.

मात्र, मृतकावर अंत्यसंस्कार करायचे सोडून गावातील लोकांनी एका मांत्रिकाला बोलवले. त्याने मंत्राच्या मदतीने मृतकाच्या आत्म्याला बोलवण्यास सुरू केली. गावातील लोक आणि नाहकच्या घरातील लोकांनीही यावर विश्वास ठेवत प्रार्थना सुरू केली होती. अखेर सोमवारी सायंकाळी गावातील लोकांनी नाहकवर अंत्यसंस्कार केले. यासंबंधी नयागढ सीडीएमओ डॉ. शक्ती प्रसाद मिश्रा यांच्यासोबत बोलणी केली गेली. ते म्हणाले की, पोस्टमार्टेममधून समोर आले की, नाहकचा मृत्यू डिहायड्रेशनमुळे झाला होता. याचा कारण हिटस्ट्रोक होतं. नयागढचे एटीएसपी उमाकांत मलिक म्हणाले की, “आम्ही केस दाखल करून पोस्टमार्टेम केलं. त्यानंतर मृतदेह घरातील लोकांकडे दिला. पुढील तपास सुरू आहे.”