Virar Hospital Fire : पतीचा आगीत मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विरार : पोलीसनामा ऑनलाइन –  खरे प्रेम केवळ नाटकांमध्ये आणि कथा, कांदब-यातच असते असे नाही. तर वास्तवीक जगात देखील ते दिसून येते. एक अशीच घटना शुक्रवारी (दि. 23) विरारमध्ये घडली आहे. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीचाही मृत्यू झाला. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच एका रुग्णाच्या पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला अन् त्यात तिचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

चांदणी दोषी असे ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोषी दाम्पत्य वसईतील 100 फूट रोड परिसरात वास्तव्यास होते. कुमार दोषी (वय 45) यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते. तर चांदणी दोषी यांच्यावर विरारमधील जिवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान रुग्णालयाला लागलेल्या आगीत कुमार यांचा होरपळून मृत्यू झाला. कुमार यांचा मृत्यू झाल्याचे समजताच चांदणी यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले. दरम्यान रुग्णालयाला आग नेमकी कशामुळे लागली याचा योग्य तपास करावा. हे खासगी रुग्णालय असून येथे अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती की नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.