‘ड्रीम’ मॉल अग्निकांडाच्या तपासाला धक्कादायक वळण, मालकालाही अटक होण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मुंबईतील भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये मार्च महिन्यात लागलेल्या आगीत सनराईस हॉस्पिटलमधील 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचदरम्यान पोलिसांच्या हाती अग्निशमन दलाची काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. ज्यामुळे मॉलचे प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सहस्रबुद्धे यांनी पोलिसांची चौकशी आणि अटकेची शक्यता पाहता कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी 7 जून 2021 सुनावणी होणार आहे.

भांडुप पोलिसानी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आग लागण्याच्या 4 महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने ड्रीम मॉलचे फायर इन्स्पेक्शन करुन प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांना नोव्हेंबर 2020 मध्ये नोटीस बजावली होती. अग्निशमन दलाच्या नोटीशीनुसार फायर इन्स्पेक्शनच्यावेळी मॉलमधील फिक्स फायर फायटिंग सिस्टम कार्यरतच नव्हती. मॉलच्या बेसमेंट आणि शेडवर काही भंगार होते. आग लागल्यावर ती विझवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणेही कार्यरत नव्हती. 2020 मध्ये दिलेल्या नोटीसद्वारे या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याची सूचना अग्निशमन दलाने दिली होती. फायर ब्रिगेडने स्पष्ट बजावले होते की, दिलेल्या सुचनांचे पालन केले नाही तर गुन्हा दाखल केला जाईल. यात 3 वर्षाची शिक्षा आणि 50 हजाराच्या दंडाचा समावेश आहे. मात्र तरी देखील अग्निशमन दलाच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले गेले. ज्यामुळे निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले. फायर डायरेक्टर प्रभात रहंगदळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला असून महापालिका आयुक्तांनी यास मंजुरी दिली आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. तसेच लवकरच दुकान क्रमांक 140 चे मालक आणि मॉल प्रशासक यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.