Shreemant Dagdusheth Halwai Ganpati | आंबा महोत्सवासह ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे अक्षय्यतृतीयेनिमित्त आयोजन ; गणरायाला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shreemant Dagdusheth Halwai Ganpati | मंगलमूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास… सनई व मंगलाष्टकांचे मंगल स्वर आणि लग्नसोहळ्यासाठी सजलेला मंडप अशा वातावरणात अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यासोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, अथर्व केदारी, पिनाक भट, बापू किकले, रवी पठारे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हे तिसरे वर्ष आहे.

दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली. मंदिरात शुक्रवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता प्रख्यात गायिका मनिषा निश्चल यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग झाला. रात्री अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते.

श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांनी लग्नसोहळ्याचे पौरोहित्य केले. तसेच आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! पात्र मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे- दीपक सिंगला