पुणे-गोरखपुर एक्सप्रेस रोज सुरु करा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याहुन गोरखपुरला जाणारी पुणे-गोरखपुर एक्सप्रेस रोज सुरु करावी. अशी मागणी विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी या मागणीचे पत्र खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना गुरुवारी (दि.१०) चिखली येथे दिले.

पुणे शहर, जिल्हा व जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, पश्चिम बंगाल येथून रोजगारासाठी स्थलांतर केलेल्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये सिवाना, देवरिया, गोरखपूर, नैनी, वनारसी, गोंडा, बस्ती, कानपूर, झांसी, लखनऊ, भोपाळ येथे जाणा-यांची संख्या जास्त आहे.

पुणे-गोरखपुर एक्सप्रेस आठवड्यातून दोन वेळा सोडण्यात येते. या गाडीचे आगाऊ बुकींग चार महिने अगोदर सुरु होते. मात्र, ऑनलाईन टिकीट बुकींगमुळे एजंट लोक काही मिनीटांतच संपून टाकतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांची कुचंबना होते. 72 आरक्षण असणा-या एका डब्यात 200 हून जास्त प्रवासी प्रवास करीत असतात. तर जनरल डब्यात जीव मुठीत धरुन 300 प्रवासी प्रवास करीत असतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचे खूप हाल होतात. या मार्गावर प्रवाशांची गर्दी पाहता पुणे-गोरखपूर एक्सप्रेस अप डाऊन रोज सुरु करावी अशीही मागणी विश्व श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.