बेघर करणाऱ्या मुख्य सचिवांना समन्स

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना राज्य मानवी हक्क आयोगाने समन्स बजावले आहेत. गोरगरिबांना बेघर केल्याप्रकरणात तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेतली. सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या कुटुंबांची अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण असताना त्यांना राज्यात अनेक ठिकाणी बेघर करण्यात आले. त्याविरोधात श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी आयोगाकडे दाद मागितली आहे. मुख्य सचिवांनाच नोटीस बजावल्याने महसूल यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

धनदांडग्या अथवा राजकीय पुढाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून सरकारी जागा हडप केल्यास सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०११ व या अनुषंगाने राज्य सरकारने १२ जुलै २०११ रोजी सरकारी जागेवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यातून गरीब कुटुंबांना वगळण्यात आलेले आहे. नळदुर्ग (उस्मानाबाद), निघोज (अहमदनगर) कन्नड (औरंगाबाद) यासारख्या असंख्य ठिकाणी सरकारी धोरणाविरोधात जाऊन गरिबांना बेघर करण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे १९६२ पासून राहत असलेल्या कुटुंबांना अमानुष पद्धतीने बेघर करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज अथवा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड आदी ठिकाणी गरिबांना राहत्या जागेतून बेघर करण्यात आले.

त्या नाराजीने राजेंद्र निंबाळकर यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दिली होती. त्याची गंभीर दखल घेत, आयोगाने मुख्य सचिवांनाच समन्स जारी केले. त्यांना १५ जानेवारी रोजीच्या सुनावणीला हजर राहावे लागणार आहे.