अंधश्रद्धेचे बळी ! शरीरावर हळद-चंदनाचा लेप लावून माय-लेकाची हत्या, कल्याणमधील धक्कादायक प्रकाराने खळबळ

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – अंगात भूत असल्याच्या संशयावरून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून मायलेकाला जीवे ठार मारल्याची घटना कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात घडली आहे. अटाळी येथे अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अघोरी बाबासह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

पंढरीनाथ तरे (वय- 50) आणि चंदूबाई तरे (वय-76) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. या प्रकरणी पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे (वय-27), विनायक कैलास तरे (वय-22) आणि मांत्रिक सुरेंद्र पाटील (वय-35) यांच्यासह मृताच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार अटाळी यथील गणेश नगरमधील भोईर कंपाऊंड परिसरातील सद्गुरू माऊली कृपा सदन येथे घडला. या संपूर्ण घटनेचा खडकपाडा पोलीस तपास करत आहेत.

मयत पंढरीनाथ तरे यांची पुतणी कविता तरे हिच्या अंगात दैवीशक्ती संचारत असल्यामुळे तिला पंढीराना यांची पत्नी आणि कविताची आई सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे नियमित घेऊन जात होती. ढोंगी मांत्रिक सुरेंद्र याने त्यांना पंढरीनाथ आणि चंदूबाई या दोघांना भूतानं पछाडले असून, घरात त्याचा त्रास होत आहे. हे भूत उतरवल्यास घरात भरभराट येईल, असे त्याने सांगितले. त्यांच्या अंगातील भूत तंत्रमंत्र करून पळवावे लागेल अशी बतावणी केली. या अंधश्रद्धेला बळी पडत विनायक आणि कविता यांनी काका आणि आजीचे मन वळवून त्यांना अंगातील भूत उतरवून घेण्यास तयार केले. यानंतर पंढरीनाथ तरे यांच्या अटाळी येथील राहत्या घरातच भूत उतरवण्याची तयारी केली होती. 25 जुलैला दुपारी चार वाजल्यापासून हा जीवघेणा प्रकार सुरु झाला. यामध्ये मृताचा अल्पवयीन मुलगा देखील सहभागी झाला.

हा अघोरी प्रकार सुरु झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास चंदूबाई आणि पंढरिनाथ यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. रात्री पावणेनऊ पर्यंत चाललेल्या या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मयताचा भाचा देवेंद्र भोईर याने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्याच्या तक्रारीवरून पहाटे खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक करण्यात आली.