रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’मधील अभिनेते, सुपरस्टार विवेक यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन; गुरुवारी घेतली होती ‘लस’

चेन्नई : वृत्त संस्था – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’मधील अभिनेते विवेक यांचे शनिवारी पहाटे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. आपल्या विनोदी अभिनयाने सुपरस्टार बनलेल्या विवेक यांनी अनेक मातब्बर अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. त्यांनी गुरुवारी कोरोनाविरोधी लस घेतली होती.

त्यानंतर त्यांनी शुक्रवारी डोके दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना चेन्नईमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली. त्यात त्यांच्या ह्दयाला रक्त पुरवठा करणारी एक नस ब्लॉक झाल्याचे दिसून आले होते. उपचार सुरु असतानाच पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

त्यांनी शिवाजी, अन्नियन, बिगिल, धूल, सिंघम, आथि, विश्वासम, वीआईपी २, मिन्नाले आदि चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती. भारत सरकारने त्यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते. विवेक  डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे व्यक्ती होते. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये त्यांनी चाहते निर्माण केले होते.