तमिळनाडूत परीक्षेविनाच पास होणार 9 वी, 10 वी आणि 11 वीचे विद्यार्थी

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनसारखे निर्णय घेण्यात आले होते. तर काही ठिकाणी अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामध्ये शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात नववी, दहावी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविनाच पास करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी असाधारण आव्हान बनले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक्सपर्टस् आणि विद्यार्थ्यांच्या सल्ल्यावर विचार केला आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना 2020-21 च्या शैक्षणिक वर्षात बोर्डाची परीक्षा द्यायची आहे. ज्यामध्ये नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पास केले जाणार आहे.

शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षण

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा 25 मार्च, 2020 पासून बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, या विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षणिक टीव्ही चॅनेल ‘कालवी थोलईकाची’ माध्यमातून शिक्षण सुरुच होते.