टाटा समूहाची (Tata Group) कंपनी टाटा सन्सने (Tata Sons) विस्तारवाढीकडे टाकले पाऊल

पोलीसनामा ऑनलाइन – टाटा समूहाची (Tata Group) कंपनी टाटा सन्सने (Tata Sons) विस्तारवाढीकडे पाऊल टाकले आहे. टाटा सन्सने आता मोबाईल पार्ट व्यवसायात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी कंपनी तामिळनाडूत मोठा प्रकल्प उभारणार आहे.

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, या योजनेसाठी टाटा सन्स तब्बल १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. एका वृत्तसंस्थेने सांगितले की, टाटा समूह या योजनेकरिता १.५ कर्ज घेणार आहे. त्यातील ७५ कोटी डॉलर्स ते एक अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम कंपनी एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंगद्वारे जमवणार आहे. टाटा सन्स कंपनीने नव्या प्रकल्पावर सीईओ नेमण्यासाठी शोध सुरू केला आहे. या प्रकल्पात सर्वप्रथम आयफोनचे पार्ट बनवले जातील, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भारतात पार्ट विकसित करण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणतीही कंपनी त्यासाठी पुढे आली नाही. आजही देशातील मोबाईल कंपन्या मोबाईलचे पार्ट अन्य देशातून (प्रामुख्याने चीनमधून) मागवत आहे. अखेर टाटा समूहाने यात रस दाखवला आहे. टाटाच्या या योजनेमुळे त्यांचा भारतातील व्यवसाय वाढेलच, पण भारत चीनला जोरदार टक्करसुद्धा देईल.