GST : तब्बल 11,520 कोटीचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत 114 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जीएसटी अधिका-यांच्या सतर्कतेमुळे देशभरातील जीएसटी (GST) करबुडवेगिरीचा 11,520 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 1,230 प्रकरणांत आतापर्यंत 114 जणांना अटक केली आहे. या घोटाळ्याची रक्कम ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात गोळा झालेल्या एकूण जीएसटीच्या 10 टक्के आहे.

जीएसटी कर बुडविण्यासाठी खोटी देयके तयार केली होती. त्यामुळे जीएसटी संकलनात मोठी तूट येत होती. या संदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष अजितकुमार यांनी या विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले की, जीएसटी बुडविण्याचे प्रकार शोधून काढण्यासाठी गेल्या महिनाभरापासून शोधमोहीम सुरू आहे.

GST नोंदणी करताना ओळख अनिवार्य

जीएसटीच्या बुडविलेल्या 11,520 कोटी रुपयांपैकी आतापर्यंत 336.63 कोटी रुपये वसूल केले आहेत. ज्यांच्याकडे अद्याप आधार कार्ड किंवा आयकर भरणा केल्याची कागदपत्रे नसतील, अशा लोकांच्या नावांची जीएसटीसाठी नोंदणी करताना त्यांची ओळख नीट पटविणारी प्रक्रिया वापरावी, असे जीएसटी कौन्सिलच्या विधी समितीने म्हटले होते. तसेच करबुडवेगिरीचे प्रकार टाळण्यासाठी नव्या करदात्यांची नोंदणी प्रक्रिया त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी जोडली जावी. ती ऑनलाइन व लाइव्ह फोटो वापरून व्हावी, तसेच बनावट व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीतून वगळण्यासाठी पावले उचलावीत, असेही समितीने म्हटले आहे.