Coronavirus : साऊथ स्टार राम चरणला ख्रिसमस पार्टी पडली महागात, झाली ‘कोरोना’ची लागण

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा सुपरस्टार राम चरण याची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. मंगळवारी (दि. २९ डिसेंबर) रामने ट्विटवरुन याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे.

राम चरण ट्विट करत म्हणाला, “मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मी स्वतःला घरात विलगीकरण केलं आहे. मी लवकर बरा होईल, अशी आशा करतो. तसेच गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी कोरोना चाचणी करुन घ्यावी,” असे आवाहनही त्याने केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचरण २२ डिसेंबर रोजी एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमाचे शूटिंग करत होता. त्याच दिवशी त्याने सुश्मिता कोनिडेलाच्या वेबसीरिजसाठी प्रमोशन सुद्धा केले होते. त्याचसोबत, २५ डिसेंबरला त्याने मित्रांसोबत एका छोटीशी पार्टीही अटेंड केली होती. त्याचे फोटो त्याने समाज माध्यमात शेअर केले होते.

मार्च महिन्यातच रामचरणने ट्विटरवर आपले अकाउंट काढले होते. त्यानंतर २२३ दिवसांतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटींवर गेली होती. फक्त २२३ दिवसांत १० कोटी ट्विटर फॉलोअर्स मिळवणारा रामचरण दाक्षिणात्य पहिला अभिनेता ठरला.