Video : श्रीनगरमध्ये पोलिसांवर बेछुट गोळीबार करून पळाले दहशतवादी, समोर आला व्हिडीओ

श्रीनगर : श्रीनगरच्या बारजुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये जम्मू-काश्मीरचे दोन जवान शहीद झाले. या घटनेनंतर चारही बाजूंनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सध्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अज्ञात लोकांवर गोळीबार सुरु होता. मात्र, सुरक्षा यंत्रणेने हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. एका भागातून आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यानंतर त्याच भागातून पलायन केले. या घटनेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हावी, यासाठी दहशतवाद्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांनी पोलिसांवर अत्यंत जवळून अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर ते पळून गेले. भरबाजारात अशाप्रकारचा गोळीबार झाल्याने श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले.

 

 

 

 

 

दरम्यान, सध्या या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. यामध्ये जखमी झालेल्या पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दोन पोलिस कर्मचाऱ्यांना वाचवता आले नाही. शहीद झालेल्या जवानांमध्ये एका कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

गेल्या तीन दिवसांतील दुसरा दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी एका रेस्टॉरंटच्या मालकाच्या मुलाची हत्या केली होती. त्यानंतर हा हल्ला झाला. पोलिसांवर झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.