विना हेल्मेट प्रवास करणार्‍या वडिलांचीच ‘ठाणेदार पोरी’नं फाडली पावती

लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन – वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना नेहमीच त्रास दिला जातो, असा आरोप केला जातो. तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिला ट्रॅफिक पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र उत्तर प्रदेशातील एकदिवसीय महिला पोलिसाने चक्क स्वत:च्या वडिलांना दंड ठोठावत पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठेच उदाहरणच सर्वांसमोर ठेवले आहे. वाहन तपासणीदरम्यान विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या स्वत:च्या वडिलांचीच या मुलीने पावती फाडली आहे.

आकांक्षा गुप्ता असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. बालिका दिनाच्यानिमित्ताने ऊसराहार पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून तीला संधी दिली होती. यावेळी तीने पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रभारी अमरपाल सिंह आणि पोलीस सहकाऱ्यांसोबत गावात परेड केली. त्यावेळी दुचाकीवरुन विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या वडिल अरविंद गुप्ता यांनाही आकांक्षाने अडवले. त्यांच्याकडून दंड वसुल करुन त्यांना पावतीही दिली. तसेच, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी यापुढे हेल्मेट घालूनच प्रवास करण्याची सूचना केली. त्यावेळी, वडिल अरविंद गुप्ता यांनीही मुलीचा सल्ला कटाक्षाने पाळणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीचीही तीने तत्काळ दखल घेतली. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या भोले सक्सेना यांची विचारपूस करुन त्यांच्या तक्रारीसंदर्भात उप निरीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले. एकदिवसीय पोलीस ठाणे प्रभारी बनविल्याने आकांक्षाने आनंद व्यक्त केला, तसेच पोलिसांच्या कामकाजाला जवळून अनुभवता आल्याचे सांगितले. तसेच, तक्रारींची नोंद घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही दिल्याचे आकांक्षाने सांगितले.