फेब्रुवारी महिन्यात बंद होतोय ‘द कपिल शर्मा शो’ ! ‘या’ 2 महत्त्वाच्या कारणांमुळं निर्मात्यांनी घेतला निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – कॉमेडीयन कपिल शर्मा ( Kapil Sharma) याच्या द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) या शोमध्ये आजवर अनेक कलाकार आले आहेत. कपिल देखील आपल्या पाहुण्यासोबत खूप मस्ती आणि कॉमेडी करताना दिसत असतो. आता लवकरच हा शो बंद होणार आहे. याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे हा शो नव्या स्वरूपात आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. एका वृत्तानुसार, द कपिल शर्मा शो काही महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. नंतर तो पुन्हा लाँच केला जाईल. असंही सांगितलं जात आहे की, शो बंद होण्याचं कारण काही औरच आहे.

असं बोललं जात आहे की, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा शो ऑफ एअर होईल. डिसेंबर 2018 मध्ये हा शो ऑन एअर झाला होता. यात भारती सिंह, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, अर्चना पूरण सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कोणतेही सिनेमे रिलीज होत नाहीत, स्टार्स प्रसिद्धीसाठी येत नाहीत

या शो शी संबंधित एका सूत्रानं इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं की, शोची नव्यानं रचना करण्याचा कोणताही मानस नाही. शोची धाटणीच लोकांना आवडते. मुळात या शोचा महत्त्वाचा घटक हा प्रेक्षक होता. कोरोनामुळं त्यांनाही सेटवर येण्यास बंदी घालण्यात आली. या काळात फार सिनेमेही रिलीज झाले नाहीत. त्यामुळं कोणतेही स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले नाहीत. या सर्व कारणांमुळं निर्मात्यांनी काही महिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व काही ठिक झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येऊच असंही ते म्हणाले आहेत.

पत्नी गरोदर असल्यानं कपिलला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे

सूत्रांनी असंही सांगितलं की, दुसरी गोष्ट म्हणजे कपिल शर्मा पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. त्याची पत्नी गिनी चतरथ (Ginni Chatrath) आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. शोचा हा ब्रेक कपिलसाठी योग्य ठरेल. त्याला कुटुंबासोबत वेळही घालवता येईल. कदाचित कपिल शर्मा शो चांगल्या कंटेटसह 3 महिन्यांनंतर पुन्हा परत येईल.

गेल्या काही महिन्यात अनेक टीव्ही मालिका अशा दिसल्या आहेत ज्यांनी ब्रेक घेतला आहे. काहींनी तर मालिका थांबवल्या सुद्धा आहेत. ज्या मालिका थांबल्या त्यांची जागा नवीन मालिकांनी घेतली आहे. आता कपिलचाही हा शो ऑफ एअर होणार आहे. त्यामुळं चाहते नाराज होऊ शकतात. परंतु पुन्हा ते जोमानं परत येतील असंही बोललं जात आहे.