अन् अचानक गायब झाली मंदिराच्या खजिन्याची चावी

ओडिशा : पोलीसनामा ऑनलाईन

ओडिशाच्या पुरी येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची चावी अचानक गायब झाल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पुरीचे शंकराचार्य आणि राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकारवर टीका केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४ एप्रिल रोजी तब्बल ३४ वर्षांनंतर एक चौकशी पथक मंदिरात आले होते. तेव्हापासून ही चावी गायब झाली असल्याची माहिती श्री जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा यांनी दिली.

प्रकरणाला राजकीय वळण

या प्रकरणावरुन राजकारणाला सुरूवात झाली आहे. चावी कशी गायब झाली आणि यासाठी जबाबदार कोण आहे, याबाबत भाजपाने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. तर, या घटनेवरून राज्य सरकार आणि मंदिर प्रशासन स्वत:ची जबाबदारी पार पाडण्यास कमी पडल्याचे दिसत आहे, अशी टीका शंकराचार्यांनी केली.

५० कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न असलेल्या या मंदिराची एकूण मालमत्ता २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. या मंदिरातील खजिना लुटण्यासाठी १२ व्या शतकापासून आतापर्यंत १८ वेळेस हल्ला झाला पण कोणीही हा खजिना लुटू शकलं नाही असंही म्हटलं जातं. मंदिरात ७ कक्ष असून यापैकी केवळ ३ मंदिर द्वार खोललेले आहेत.