इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर नितीन गडकरींचं ‘हे’ मोठं वक्तव्य 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध नाही असे सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हात झटकले आहेत. शिवाय या हल्ल्याचा निषेध करणे तर दूरच याउलट जर भारताने काही कारवाई केलीच तर भारताला चोख प्रत्युत्तर देऊ असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवू असा थेट इशारा पाकिस्तानला दिला आहे. त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला आहे. भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडू आणि पाकिस्तानला ओसाड बनवून टाकू असा इशारा गडकरी यांनी दिला आहे.  या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे सांगत याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर  जै-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. आदिल अहमद दार याने 350 किले स्फोटके असणारी गाडी जवानांच्या बसला धडकवली. यानंतर झालेल्या भीषण अपघातात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर देशात जनतेकडून संताप व्यक्त होताना दिसून आला. पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून होऊ लागली.

यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त न करता भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान गप्प बसणार नसल्याची दर्पोक्ती केली होती. इतकेच नाही तर, त्यांचाच एक खासदार मंत्री पाकिस्तानातील  मंदिरांत घंटा वाजवू देणार नाही असंही बरळला होता. यानंतर आता  नितीन गडकरी यांनी पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवू असा थेट इशारा पाकिस्तानला दिला आहे.