Lockdown in Maharashtra : संपूर्ण Lockdown लागल्यास शहरातून गावाला जाण्यास मुभा मिळणार का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर याबाबत थेट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर रविवारी (दि. 11) त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास मुख्यमंत्री लोकांना शहरातून गावाला जाण्यासाठी मुभा देणार का, हे पाहावे लागणार आहे.

आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावी लागेल असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन केल्यास हातावर पोट असलेल्या कामगारांचे मोठे हाल होतात, याचा अनुभव गेल्या वर्षीच संपूर्ण देशाला आला आहे. अचानक लॉकडाऊन केल्यामुळे शहरात उदरनिर्वाहासाठी आलेले नागरिक अडकून पडतात. रोजगार गेल्यानंतर शहरात थांबून करणार काय आणि उदरनिर्वाहासाठी पैसे आणणार कुठून, असा प्रश्न या कामगारांसमोर उभा ठाकतो. त्यामुळे मग हे कामगार मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावी जाण्याची धरपड करतात. कष्टकऱ्यांचे असे हाल होऊ नयेत, यासाठी लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेऊ नये, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.