उल्हासनगरात तृतीयपंथीयांचा रंगला फॅशन शो

पोलीसनामा ऑनलाइन – तृतीयपंथी हे समाजाचे घटक असून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांनी बदलायला हवा. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वान्या फाउंडेशन व किन्नर अस्मिता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तृतीयपंथीयांमधील सुप्त गुण बाहेर काढून त्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी शहरातील रिजेन्सी हॉलमध्ये फॅशन व डान्स शोचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ५० जणांनी यामध्ये भाग घेतला. ही उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आयोजक नगरसेविका रेखा ठाकूर यांनी दिली. शहरातील शहाड फाटक व कॅम्प नंबर ४ ओटी सेक्शन परिसरात किन्नरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये उच्चशिक्षितांची संख्याही मोठी आहे. वर्षभर त्यांच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जातात.

दरम्यान, कोरोना काळात त्यांच्या मनावर आलेली मरगळ दूर सारण्यासाठी वान्या फाउंडेशन व किन्नर अस्मिता सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. कॅम्प नंबर ३ येथील रिजेन्सी हॉलमध्ये शुक्रवारी फॅशन व डान्स चे आयोजन केले. कार्यक्रमाला शहरासह भिवंडी, अंबरनाथ, कल्याण आधी शहरांतून मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी आले होते. तर ५० पेक्षा जास्त जणांनी कार्यक्रमात सहभागी नोंदवून धमाल उडवून दिली.फॅशन शोमध्ये बिलो केने प्रथम तर बेलो केने, सन्नी मोरे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. डान्स मध्ये गौरी केने प्रथम व रोहित शिंदे, लक्खा केने यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

त्यांच्या सुप्त गुणांचा देशाला फायदा होण्यासाठी विविध सामाजिक संस्थेसह राजकीय पक्ष शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा व नगरसेविका रेखा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात शासनाने कोरोना काळात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.