कढीपत्त्याचे ‘हे’ 17 फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोणताही पदार्थ चटकदार आणि आणखी चवदार करायचा असेल तर त्यात कढीपत्ता( Curry leaves)  घातला जातो किंवा त्याची फोडणी दिली जाते. चवीसाठी वापरला जाणारा हा कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे होतात. याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. आज आपण कढीपत्ता खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

1) आहारातील कढी, आमटी, पोहे यांची चव वाढवण्यासाठी कडीपत्त्याची पानं नेहमी उपयोगात आणावीत. ही पानं पाचक असल्यामुळं भूक वाढते आणि घेतलेला आहार पचण्यासाठी मदत होते.

2) कढीपत्त्याच्या पानात पालक, मेथी, कोथिंबीर या भाज्यापेक्षा अ जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं. इतर भाज्यांपेक्षा या पानात कर्बोदकं आणि प्रथिनांचं प्रमाण सुधारणत: दुप्पट असतं.

3) बालकांच्या पोटात जंत किंवा कृमी झाले असतील तर त्यांना कढीपत्त्याची पानं बारीक वाटून त्याचा कल्क तयार करावा आणि या कल्कात समप्रमाणात गूळ आणि मध एकत्र करून त्याची छोटी गोळी बनवावी. ही गोळी सकाळ संध्याकाळ 2-2 या प्रमाणात द्यावी. यामुळं पोटातील कृमी नाहीसे होतात.

4) कढीपत्ता हा शीतल गुणधर्माचा असल्यानं जुलाब आणि उलट्या होत असेल किंवा त्यातून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याची पान पाण्या सोबत वाटून हे पाणी गाळून घ्यावं. 1-1 चमचा या प्रमाणात 2-3 तासांच्या अंतरानं हे पाणी प्यावं. यामुळं उलटी कमी होऊन रक्तस्त्राव थांबतो.

5) मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यावा. यामुळं रक्त पडणं थांबतं.

6) अपचन, अरूची, अग्निमांद्य (भूक कमी होणं) ही लक्षणं जाणवत असतील तर कढीपत्त्याची 2-3 पानं चावून खावीत. यामुळं बेचव तोंडाला रूची निर्माण होऊन भूक लागण्याची जाणीव निर्माण होते.

7) पोटात जर मुरडा येत असेल तर तो कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं चावून खावीत.

8) लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसात सुती कपड्याच्या घड्या बनवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळं शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

9) शरीरावर विषारी कीटकाच्या दंशानं सूज आली असेल तर कढीपत्त्याची पानं वाटून त्यावर त्याचा लेप लावावा. यामुळं सुज उतरते.

10) शरीरावर झालेली जखम भरून येत नसेल तर तसंच त्वचेवर पुरळ उठून खाज येत असेल तर कढीपत्त्याची पानं वाटून त्याचा कल्क शरीरावर चोळावा आणि जखमेवर लावावा.

11) हिरड्या कमकुवत होऊन दात हलत असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा कल्क हिरड्यांवर चोळावा. यामुळं हिरड्यांचं आरोग्य सुधारून दात मजबूत होतात.

12) दात व जीभ अस्वच्छ राहिल्यानं तोंडास दुर्गंधी येत असेल तर कढीपत्त्याची पानं चावून खावीत. यामुळं जीभेवर साचलेला पांढरा थर दूर होतो. यामुळं दात स्वच्छ होतात आणि तोडांची दुर्गंधी देखील नाहीशी होते.

13) कढीपत्त्याच्या पानांमध्ये अ जीवनसत्व विपुल प्रमाणात असल्यानं डोळ्यांच्या विकारासाठी उदा. खाज सुटणं, डोळे कोरडे होणं, आदी विकारांवर कढीपत्त्याच्या पानांचा रस काढून 1-2 थेंब डोळ्यात टाकावा. परंतु यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

14) कढीपत्त्याची पानं ही रक्तवर्धक आणि रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनानं रक्ताचं प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

15) महिलांना मासिक पाळी नियमित येत नसेल तसंच रक्तस्राव कमी होत असेल, चेहऱ्यावर काळे वांग, मुरमे, पुटकुळ्या येत असीतल, केस गळणं, कोंडा या तक्रारी असतील तर निमयमित कढीपत्त्याच्या पानांचा काढा प्यावा 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ प्यावा.

16) कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनानं मधुमेह हा आजारही कमी होतो. नियमितपणे ही पानं खाल्ल्यास रक्तातील वाढलेल्या साखरेचं प्रमाण कमी होऊन योग्य प्रमाणात होतं.

17) तळपाय व टाचेला भेगा पडलेल्या असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा कल्क, टाच स्वच्छ धुऊन त्यात रात्री झोपताना भरावा. यामुळं टाचेच्या भेगा भरून येण्यास मदत होते.

ही सावधानता बाळगा

–  कढीपत्त्याची पानं स्वयंपाकात वापरण्यापू्र्वी स्वच्छ धुवून घ्यावी.

–  अनेकजण आमटी, पोहे, कढी या आहारातील पदार्थांमधील कढीपत्ता वेचून बाहेर काढून टाकतात. उलट तो कढीपत्ता बारीक कु्स्करून आहारीय पदार्थांसोबत खाल्ला पाहिजे.

–  गृहिणींनी कढीपत्त्याचे बारीक तुकडे करूनच ते पदार्थात वापरावे म्हणजे ते खाल्ले जातील.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.