तब्बल 33 वर्षानंतर ‘या’ गाण्यावर थिरकणार वर्षा उसगावकर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या ३१ डिसेंबरच्या भागात नवीन वर्षांचं स्वागत संपूर्ण शिर्के पाटील कुटुंब अगदी जल्लोषात करणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगांवकर त्यांच्या गंमत जंमत या सुपरहिट सिनेमातील ‘उधळीत येरे गुलाल सजणा’ या सुपरहिट गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. यासाठी मालिकेतील त्यांची धाकटी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने या खास नृत्यासाठी कोरिओग्राफी केली आहे.

या परफॉर्मन्सविषयी सांगताना वर्षा उसगावकर म्हणाल्या, गंमत जंमत सिनेमात मी उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर जवळपास ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या गाण्यावर परफॉर्म करण्याचा योग जुळून आला आहे याचा आनंद होतोय. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केलं नाही. त्याकाळच्या बऱ्याच नायिकांनी या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होतेय. ३१ डिसेंबरच्या विशेष भागात माझा हा खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. मालिकेतली माझी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. दरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत ३१ डिसेंबरला प्रेक्षकांना अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.