मोटार वाहन नियमांत मोठे बदल, रजिस्ट्रेशनदरम्यान ‘हे’ काम केल्यास येणार नाही समस्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये मोठे बदल केले आहे. या बदलामुळे वाहन ट्रान्सफर करण्यास मोठी मदत मिळणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेल्या बदलामुळे आता वाहन मालक नोंदणीच्या वेळी आपला वारसदार नेमू शकतात आणि त्यानंतर ते अपडेटही करु शकतात.

हा नियम लागू झाल्यामुळे वाहनाच्या मूळ मालकाचा मृत्यू झाल्यास वाहनाची मालकी घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नव्या नियमांच्या बदलामुळे केवळ वाहन चालकांनाच मदत होणार नाही, तर वाहन मालकांच्या मृत्यूनंतर नोंदणी असलेल्या व्यक्तीला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करणं देखील सोपे जाणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात एक पत्रक काढले आहे.

नव्या अधिसुचनेनुसार, मोटार वाहनाच्या मूळ मालकाचा जर मृत्यू झाला तर आरसी बूकमध्ये वाहन मालकाने नियुक्त केलेली व्यक्ती वाहन वापरू शकते. मात्र, वाहन मालकाने नियुक्त केलेल्या व्यक्तीला वाहन मालकाच्या मृत्यूपासून तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत हे वाहन वापरता येऊ शकते. तसेच संबंधित व्यक्तीला आरटीओला यासंदर्भातील माहिती 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल. याशिवाय मूळ मालकाचा मृत्यू झाला असून आपल्याला त्या वाहनाचा उपयोग करायचा आहे, अशी सूचना संबंधित व्यक्तीला आरटीओला द्यावी लागेल.

तसेच उत्तराधिकारी असलेल्या व्यक्तीने वाहन मालकाच्या मृत्यूच्या तीन महिन्यांच्या आत आरटीओला फॉर्म 31 भरुन द्यावे लागेल. वाहनाच्या हस्तांतरणासाठी हा फॉर्म संबंधित व्यक्तीने आरटीओला भरून देणे आवश्यक असल्याचे रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वाहन चालकांना वाहन ट्रान्सफर करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.