दादा साहेब फाळके पुरस्कार सन्मानित बंगाली अ‍ॅक्टर सौमित्र चटर्जी यांचं 85 व्या वर्षी कोलकतामध्ये निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रसिध्द बंगाली अ‍ॅक्टर सौमित्र चटर्जी यांचं आज (रविवार) कोलकता येथे एका खासगी रूग्णालयात निधन झालं. शनिवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

दादा साहेब फाळके पुरस्कार सन्मानित सौमित्र चटर्जी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, ते कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हते. अखेर आज त्यांचं निधन झालं. ते 85 वर्षाचे होते. सत्यजीत रॉय यांचा अपुर संसार या सिनेमातून त्यांनी करिअरची सुरूवात केली होती. सौमित्र चटर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती. 6 ऑक्टोबरला त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह देखील आली होती. मात्र, इतर आजारांनी त्यांना जखडून ठेवलं आणि अखेर आज त्यांचं निधन झालं.