पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन उद्या (गुरुवार) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.

ADV

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत हे उपस्थितत राहणार आहेत.

पुणे महानगरपालिकेचा वाढलेला विस्तार विचारात घेऊन सध्या अस्तित्वातील इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात नवीन विस्तारीत इमारतीचे दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरुपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या नवीन वास्तूमध्ये वापरासाठी एकूण सुमारे 14 हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध झाले आहे.

तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, बँक एटीएम, पीएमपीएमएल पास केंद्र या सुविधा करण्यात आल्या आहेत.पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुसर्‍या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्षांची दालने तसचे स्थायी समिती सभागृह, इतर विषय समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.

तिसर्‍या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभेच्या सभागृहाचे आणि महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभेच्या सभागृहासाठी, जीआरसी अमटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची फ्लोअरपासून सुमारे 60 फूट इतकी आहे.

नवीन सभागृहामध्ये 224 सभासदांना बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये 180 नागरिकांसाठी आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांचे डायसचे मागील बाजून 50 अधिकारी आणि त्यावरील मजल्यावर 50 पत्रकारांसाठी कक्षाची रचना करण्यात आली आहे. आजपर्यंत या कामासाठी सुमारे 48 कोटी 75 लाखांचा इतका खर्च आला आहे. या इमारतीचे बांधकाम सव्वातीन वर्षांत पूर्ण करण्यात आले आहे.