UP मध्ये विकास दुबे पार्ट-2 : रात्री पोलिसांवर हल्ला, सकाळी एन्काऊंटरमध्ये दारू माफियाचा भाऊ ठार

कासगंज : उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये मंगळवारी सायंकाळी उशीरा दारू माफियाने जप्तीची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या दोन हवालदार अशोक पाल आणि शिपाई देवेंद्र कुमार सिंह यांना बेदम मारहाण केली. दारू माफियाने शिपायाला मारहाण करून ठार केले, तर हवालदाराची प्रकृती गंभीर आहे. या खळबळजनक घटनेनंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि चकमकीत दारू माफिया मोतीच्या भावाला ठार केले.

सिढपुरा पोलीस ठाणे प्रभारी प्रेमपाल सिंह यांनी सांगितले की, दारू माफिया आणि त्याच्या साथीदारांचा तपास करण्याचे काम पोलीस करत होते. या दरम्यान पोलीस आणि दारू माफिया यांच्यात चकमक झाली. पोलिसांना पाहून माफियाने गोळीबार करण्यास सुरूवात केली ज्यास उत्तर देत पोलिसांनी सुद्धा कारवाई केली. या चकमकीत दारू माफिया मोतीचा भाऊ एलकार सिंह यास गोळी लागली. एलकार यास गंभीर आवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कासगंजच्या नगला धीमर गावात दारूचा धंदा करणार्‍यांच्या ठिकाणांवर नोटीस देण्यासाठी गेलेले सिढपुरा पोलीस ठाण्याचे हवालदार आणि शिपाई यांना गुन्हेगारांनी पळवून-पळवून जबर मारहाण केली. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांची वर्दी फाडली आणि कागदपत्र हिसकावून घेतले. अनेक तासांच्या तपासानंतर हवालदार आणि शिपायी जंगलात रक्तभंबाळ आवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी सापडले.

सीएम योगी यांचे कठोर कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कासगंजच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई आणि घटनेत सहभागी गुन्हेगारांविराधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी गुन्हेगारांवर रासुका अंतर्गत कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश दिले.

दारू माफियाचे मैनपुरी कनेक्शन
पोलिसांवरील हल्ल्याचे कनेक्शन मैनपुरीशी सुद्धा जोडले जात आहे. येथे घटनास्थळी एक बाईक सापडली, जी गुन्हेगारांची आहे. 2016 मध्ये एटाच्या अलीगंज आणि मैनपुरीच्या काही भागात विषारी दारूमुळे 48 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये विषारी दारू मैनपुरीहूनच अलीगंज आणि एटाच्या इतर भागात पाठवण्यात आली होती. या घटनेनंतर सतत शासन आणि प्रशासनाने कठोर अंकूश लावला पण अजूनही अवैध आणि कच्च्या दारूचा धंदा सुरू आहे.