अहमदनगर : वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वंजारी समाजाने विविध मागण्यासाठी जामखेड येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. कुठल्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली न येता समाजातील सामान्य व्यक्तींनी एकत्रितपणे येऊन हा मोर्चा काढला.
‘आता नाही तर कधीच नाही’, असा निर्धार करत वंजारी समाज रस्त्यावर उतरला. कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर न घेता हा समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला आहे. जामखेड तालुक्यातील सर्व वंजारी समाज बांधवांनी आज जामखेड येथे शासकीय विश्रागृह येथून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढला होता. शालेय विद्यार्थिनी आणि तरुणींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

 दहा टक्के आरक्षण, स्व गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन करावे, उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे , जातीनिहाय जनगणना करावी वंजारी समाजासाठी जिल्हानिहाय वसतिगृह चालू करावे आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले, महिलांनी आणि विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.