खाजगी चॅटवर नाही होणार परिणाम, नव्या अटींवरील वादानंतर WhatsApp नं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   8 फेब्रुवारी 2021 पासून आमलात येणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp)वापराच्या अटी संदर्भात वाद वाढतच चालला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर असा आरोपही करण्यात आला आहे की, आपल्या कॅटेगरीत हा एकमेव अ‍ॅप आहे जो वापरकर्त्यांकडून सर्वाधिक डेटा घेतो, परंतु या गदारोळ आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, त्याच्या नवीन सेवा अटींद्वारे वैयक्तिक चॅटवर थोडाही परिणाम होणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या गोष्टी सांगितल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या रीलिजमध्ये म्हटले आहे की, ‘नवीन अपडेट्स व्हॉट्सअ‍ॅपवरुन खरेदी करणे आणि व्यवसाय करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे होईल. आज बहुतेक लोक चॅटिंग व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍पचा व्यवसाय म्हणून वापर करतात. आम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीला व्यवसायासाठी एक सुरक्षित सर्व्हिस म्ह्णून अपडेट केले आहे, जेणेकरून छोट्या छोट्या व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवरून पोहोचणे सोपे होईल. यासाठी आम्ही आमची पॅरेन्ट कंपनी फेसबुकचीही मदत घेऊ. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे अपडेट वापरकर्त्यांची गोपनीयता भंग करणार नाही. कंपनी अद्याप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी वचनबद्ध आहे. नवीन अपडेट फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपमधील डेटा शेअरिंग बदलणार नाही.

नवीन व्हॉट्सअ‍ॅप पॉलिसीमध्ये काय आहे?

या आठवड्यात, लाखो भारतीय वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणि सेवा अटींविषयी सूचना प्राप्त झाल्या आहेत, ज्या 8 फेब्रुवारीपासून अंमलात येत आहेत. या अटींमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप आपली पॅरेन्ट कंपनी फेसबुकवर पूर्वीपेक्षा अधिक डेटा शेअर करेल, ज्याचा वापर जाहिरातींमध्ये होईल. जर वापरकर्त्याने 8 फेब्रुवारी पर्यंत नवीन अटी स्वीकारल्या नाहीत तर त्याचे खाते बंद केले जाईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांच्या गोपनीयतेवर हा थेट हल्ला आहे आणि त्यांना अटी पाळण्यास भाग पाडले जात आहे. दरम्यान, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरच्या यादीनुसार व्हाट्सएप आपल्या वापरकर्त्यांकडून 16 प्रकारचे डेटा घेतो.