कोणत्याही धर्माबाबत वक्तव्य करण्यापूर्वी विचार करावा, एल्गार परिषदेवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक विधान करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोणत्याही धर्माबाबत वक्तव्य करण्यापूर्वी विचार करावा. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, टीका करताना शब्द जबाबदारीने वापरले गेले पाहिजेत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

हिंदु धर्मात अनेक त्रुटी आहेत, पण

छगन भुजबळ पुढे म्हणाले, वक्त्यांनी देखील एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या धर्मावर टीका करताना शब्द अधिक जबाबदारीने वापरावेत. दुसऱ्या धर्माच्या एखाद्या व्यक्तीने तर त्या धर्मावर काही शब्द वापरले तर सहाजीकच उद्रेक निर्माण होईल. हिंदु धर्मामध्ये अनेक त्रटी आहेत, अंधश्रद्धा आहे. अनेक गोष्टी अशा आहेत ज्याला महात्मा जोतीराव फुले, सावीत्रीबाई फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी वाचा फोडली. पण ते सगळे हिंदु धर्मात होते हे पण लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी हिंदु धर्मातील चुकांवर बोट ठेवलं आणि त्याप्रमाणे सुधारणा होतेय.

तर त्यांना राग आला असता

हेच जर एखाद्या हिंदु धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्माविषयी असे शब्द वापरले असते तर राग आला असता. तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही धर्मावर टीका करा, कोणत्याही विषयावर टीका करा. परंतु शब्द लोकांना झोंबणार नाहीत अशा पद्धतीने शब्दांची निवड केली पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

पोलीस चौकशी करतील

एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल पोलीस त्यामध्ये चौकशी करतील असे भुजबळ यांनी सांगितले. तसेच यामध्ये अयोग्य असेल तर पोलीस कारवाई करतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.