PCOS मुळे येऊ शकते वंध्यत्व? जाणून घ्या त्याची कारणे आणि लक्षणे काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : वंध्यत्व ही समस्या अनेकांना सतावत राहते. मात्र, वंध्यत्व येण्यामागे ‘पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम’ (PCOS) हे अनेकदा कारण असू शकते. ‘पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम’ अर्थात PCOS हा प्रत्येक दहामधील एका स्त्रीला होतो. ज्यावेळी मूल जन्माला घालण्याचा निर्णय जोडप्यांमध्ये होतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरु होतात तेव्हा PCOS असल्याचे बऱ्याचदा लक्षात येते. हा PCOS कधी होईल याला काही विशिष्ट वय नसते. प्रजननाची क्षमता असलेल्या वयातील कोणत्याही स्त्रीला PCOS होऊ शकतो.

PCOS ची लक्षणे काय?

– गर्भधारणेत अडचणी

– चेहरा, छाती आणि ओटीपोटावरील केसांमध्ये वाढ

– अंगदुखी

– शरीरावर विशेषतः चेहरा आणि मानेवर प्रचंड वांग येणे.

– मान आणि काखेतील स्नायू जाड होणं.

– केस गळणे. पुरुषांसारखं टक्कल पडणं.

– स्थूलता

– पाळीतील अनियमितता : मासिक पाळीच्या चक्रात अनियमितता येते. दर महिन्याला पाळी न येता वर्षातून 12 ऐवजी 8 पेक्षाही कमी वेळा पाळी येते किंवा 21 दिवसांआधीच पाळी यायला लागते.

काय आहेत PCOS ची कारणे?

बहुतांश वेळा, शरीरातील पुरुषी हार्मोन्स वाढल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. अँड्रोजेन हे पुरुषी हार्मोन स्त्रीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर तयार होते. याचा परिणाम अंडकोषावर आणि गर्भधारणेवर होतो. मात्र, PCOS नक्की कशामुळे होतो हे कारण अजूनही पुरेसं स्पष्ट नाही. काहीवेळा PCOS मुळे शरीरात वाढणाऱ्या इन्सुलिनवर ताबा ठेवता येत नाही. तसेच रक्तातील इन्सुलिन लेव्हल वाढली की त्याचा प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. ज्यामुळे वजन वाढते आणि PCOS ची लक्षणेही वाढत असतात.

PCOS असताना गर्भधारणा होऊ शकते का?

PCOS मध्ये गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी मासिक पाळीच्या चक्राचा नीट अभ्यास केला गेला पाहिजे. PCOS आवश्यक आणि योग्य त्या उपचारांसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला. सल्ला घ्या. डॉक्टर तुमच्या शरीरातील हार्मोन लेव्हल्स रक्त तपासणीमधून तपासतील, शारीरिक तपासणी आणि सोनोग्राफी केल्यानंतर तुमचं ओव्यूलेशन औषोधोपचारानं नियंत्रणात आणले जाईल. जर औषधांचा अपेक्षित परिणाम झाला नाही तर मात्र कृत्रिम गर्भधारणेच्या (इन विट्रो फर्टीलायझेशन) पर्यायाचा विचार केला पाहिजे.