CJI शरद बोबडेंनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण? ‘या’ मंत्र्यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपूत्र शरद अरविंद बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. शरद अरविंद बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश पदाचा मान तिसऱ्यांदा महाराष्ट्राला मिळाला आहे. शरद बोबडे यांच्याअगोदर न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड या महाराष्ट्रीयन न्यायधीशानी सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळली होती. येत्या २३ एप्रिलला न्यायमूर्ती शरद बोबडे निवृत्त होणार आहेत.

न्या. बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगू लागली आहे. न्या. बोबडे यांच्या निवृत्तीस फक्त १ महिनाच बाकी राहिला आहे. यामुळे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बोबडेंनाच पत्र लिहून पुढले सरन्यायाधीश कोण असा प्रश्न केला आहे. तसेच ४८वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे कोणाची नियुक्ती करणार अशी विचारणा या पत्रात करण्यात आली आहे.

सध्या न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांचे नाव समोर येत आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. आतापर्यंतच्या परंपरेनुसार रमणाच देशाचे पुढील सीजेआय म्हणजेच न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे उत्तराधिकारी असतील. आतापर्यंतच्या परंपरेनुसार निवृत्त होणारे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील नव्या सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस एक महिना आधी राष्ट्रपतींना पत्राद्वारे करतात. हे पत्र अतिशय गोपनीय पद्धतीने पाठवण्यात येते. सरन्यायाधीशांकडून हे गोपनिय पत्र राष्ट्रपतींना मिळताच सरकार सर्व औपचारिकता पूर्ण करून ज्येष्ठ असलेल्या जजना मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात. इतिहासात एक-दोन वेळाच असे घडले की, सरकारने ज्येष्ठता क्रमाचे उल्लंघन करत कनिष्ठ जजना सर न्यायाधीश बनवले आहे. यावेळी मोठा वादसुद्धा निर्माण झाला होता. राष्ट्रपतींना पत्र लिहून उत्तराधिकारी निवडण्याची परंपरा अनेक दशकांपासून चालत आली आहे.

शरद बोबडेंची नियुक्ती कोणी केलेली?
शरद बोबडे यांच्या अगोदर न्या. रंजन गोगोई हे सरन्यायाधीश होते. त्यांनी आपल्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात ऐतिहासिक अयोध्या निकाला दिला होता. त्यानंतर न्या. रंजन गोगोई यांनीच न्यायमूर्ती म्हणून शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वीच केली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१९ रोजी सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांची नियुक्ती केली होती.