आपण जांभई का देतो ? कधी उलगडणार आपल्या शरीराचं हे रहस्य ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आपल्याला ठाऊकच आहे की कंटाळा आल्याने, थकव्यामुळे किंवा एखाद्याला नुसतं पाहिल्यानेही जांभई देण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. पण आपल्या शरीरावर या जांभईचा काय परिणाम होतो? हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आज आपण त्याबाबत जाणून घेऊया.

हजारो वर्षं आपल्याला बुचकळ्यात टाकत आलेल्या या जांभईचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न प्रोव्हाईन यांनी अशाच प्रयोगांमधून केला. मॅरीलँड, बॉल्टीमोर काउंटी विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले प्रोव्हाईन यांनी जांभईबद्दल लिहिलं आहे की, “मानवी वर्तनातला अत्यंत नैसर्गिक पण ज्याबद्दल अनेकदा गैरसमज होतात, असा भाग म्हणजे जांभई.”

तब्बल तीन दशकांनंतर आपल्याला याचं उत्तर सापडलं आहे असं वाटू शकतं, पण या चमत्कारिक उत्तराने अभ्यासविश्वात बरेच मतभेद निर्माण झाले आहेत. 2,500 वर्षांपूर्वी होऊन गेलेले हिप्पोक्रॅटीस नावाचे ग्रीक फिजिशिअन हे जांभईचा अभ्यास करणारे पहिले व्यक्ती होते. त्यांच्या म्हणण्यानुसार जांभई दिल्याने शरीरातील अपायकारक, विषारी वायू बाहेर पडतो. त्यांनी लिहून ठेवलं आहे की, “ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या घंगाळ्यात पाणी उकळत ठेवल्यास त्यातली वाफ जशी बाहेर पडत असते, अगदी त्याप्रमाणेच आपल्या शरीराचं तापमान वाढलं की शरीरात जमा झालेली हवा आपल्या तोंडावाटे वेगानं बाहेर पडते.”

तसेच प्रोव्हाईन यांचे म्हणणे आहे की, “दुसऱ्याला जांभई देताना पाहून 50% लोक प्रतिसाद म्हणून स्वतः जांभई देत असतात. हे संसर्गजन्य असून जांभईशी संबंधित काहीही असो, जसं की एखाद्याला जांभई देताना पाहणं, ऐकणं किंवा अगदी त्याबद्दल वाचणंसुद्धा आपल्याला लगेच जांभई आणणारं असतं.” या अशा काही कारणांमुळेच बऱ्याच अभ्यासकांचा असा विश्वास आहे की जांभई देणं हे मानवी आयुष्यातलं संवादाचं एक प्राचीन साधन तर नाही? असे देखील अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.

जांभईच्या बाबतीत बर्न विद्यापीठाचे ख्रिश्चन हेस यांचं मत आहे की, “जांभईचं प्रमुख काम संकेत देणं हे असून या संकेतांमुळं एका सामाजिक गटातील लोकांचं वर्तन सिंक्रोनाइज करता येतं. उदाहरणार्थ, अशा समूहातील प्रत्येकाला साधारणपणे एकाच वेळी झोपण्याची सवय असणं.”

प्रोव्हाईन प्रमाणेच इतर अभ्यासकांची अशी धारणा आहे की आपला मेंदू तणावपूर्ण क्षण रिबूट करण्यात आपली मदत करत असतो. जेव्हा आपल्याला झोप येत असते तेव्हा तो तुम्हाला जांभईच्या माध्यमातून सावध करतो, किंवा तुम्ही विचलित होत असाल तर तुम्हाला पुन्हा एकाग्र व्हायला मदत करतो. या सगळ्याची क्रिया जरी अस्पष्ट असली तरी फ्रेंच अभ्यासक ऑलिव्हर वालुसिंस्कीच्या मते जांभई दिल्याने मेंदू आणि मज्जारज्जू यांच्या सभोवताली फिरणारा द्रवपदार्थ (cerebrospinal fluid) उसळतो, ज्यामुळे मेंदूच्या कार्यात एक बदल घडतो.

या अशा वेगवेगळ्या परस्परविरोधी कल्पनांमुळे, जांभई देण्याबद्दलचा सर्वसमावेशक असा एक सिद्धांत मांडणं फार कठीण काम आहे. पण गेल्या काही वर्षांत या सगळ्या संकल्पनांना एका धाग्यात बांधू शकेल, अशी एक यंत्रणा तयार होत असल्याचे समोर येत आहे.

आता ऑनेओंता इथे न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या अ‍ॅण्ड्र्यू गॅलप यांना पदवीचे शिक्षण घेत असताना पहिल्यांदा हे लक्षात आलं की जांभई दिल्याने मेंदू थंड होण्यास आणि कमी तापमान टिकून राहण्यास मदत होते. त्यांचं म्हणणं आहे की जांभई देताना जबड्यात होणाऱ्या वेगवान हालचालींमुळे आपल्या कवटीभोवती रक्ताभिसरण होतं असतं. या क्रियेमुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडते. तसंच दीर्घ श्वास घेतल्याने सायनस कॅव्हिटीजमध्ये आणि कॅरोटीड आर्टरीच्या आजूबाजूला गार हवा पोहोचते. हा गारवा इथून पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचतो.

त्याचप्रमाणे या तणावपूर्ण हालचालीमुळे सायनसच्या बाहेरील त्वचेवर म्हणजेच मेम्ब्रेनवर ताण येऊ शकतो. यामुळे गार वाऱ्याची हलकीशी लहर या कॅव्हिटीमधून वाहते आणि म्युकस म्हणजे श्लेष्मा नाहीसा होऊन मेंदू वातानुकुलीत व्हावा तसा थंड होत असतो.