डोंबिवलीत पतीकडून पत्नीवर सपासप वार, बायको गावी जायला नव्हती तयार

पोलिसनामा ऑनलाईन – डोंबिवली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने गावी जाण्यास नकार दिला म्हणून पतीने पत्नीची हत्या केली. या निर्दयी पतीने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करुन पत्नीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे (Husband Murder Wife). रात्रीच्या ट्रेनचे तिकीट असतानाही वारंवार सांगूनही पत्नी मनिषा गावी जाण्यास तयार नव्हती. या रागातून पती शिवकुमार यादवने पत्नीची गळा चिरुन हत्या केली.

दरम्यान, हे सर्व घडत असताना त्यांचा लहान मुलगा घरातच होता. समोर घडत असलेला प्रकार पाहून तो घाबरला. त्याला समजत नव्हते की काय करु. तेवढ्यात कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी टिळक नगर पोलिसांनी शिवकुमार याला रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवकुमार यादव हा पत्नी मनिषा आणि दोन मुलांसह डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका परिसरात मोहन चाळीत राहत होता. त्यांना एक १८ वर्षाचा तर दुसरा ११ वर्षाचा मुलगा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार पत्नीसोबत गावी जाणार होता. आज (२९ जानेवारी) सकाळपासून त्याची तयारी सुरु होती. मोठा मुलगा कामाला गेला होता. सकाळी १० ते ११ च्या सुमारास या पती-पत्नी मध्ये जोरदार वाद झाला. लहान मुलगा त्यावेळी घरातच होता. पत्नी मनिषा ही गावी जाण्यासाठी नकार देत होती. याचा राग आल्याने शिवकुमार याने घरातील चाकू घेऊन पत्नी मनिषाच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.