चारित्र्याच्या संशयावरुन डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीचा खून

नगरः पोलीसनामा आॅनलाईन

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी भागातील विळद गावात घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.६) पहाटे उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रवीण गडापे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे नगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विळदमधील गवळीवाडा येथे राहणारा प्रवीण गडापे याला आपली पत्नी स्वातीवर संशय होता. यावरुन पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. प्रवीणच्या त्रासाला कंटाळून स्वाती आपल्या माहेरी राहत होती. ती परत आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाले. संशयाने पछाडलेल्या प्रवीणने रविवारी पहाटे स्वाती हिच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी प्रवीणला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.