हेपेटायटीस म्हणजे काय ? कोणत्या विषाणुंमुळं होतो आजार ? जाणून घ्या ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’ !

पोलिसनामा ऑनलाईन – हेपेटायटीस म्हणजे यकृताचा दाह. हा आजार हिपॅटायटीस विषाणू ए, बी, सी डी आमि ई यांच्यामळं व इतर काही कारणांमुळं होतो. हा नेमका आजार काय आहे, याची लक्षणं कोणती आहेत आणि त्यावर उपाय कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हेपेटायटीस म्हणजे काय ?

हेपेटायटीस हा एक यकृताचा विकार आहे. यात यकृताला सूज येते. हा आजार हेपेटायटीस विषाणूंच्या संसर्गामुळं होतो. भारतीय लोकांमध्ये यकृताला लागण झालेल्या बऱ्याच विषाणूंपैकी हेपेटायटीस ए, बी, सी आणि ई विषाणूंची लागण ही सर्वाधिक झालेली दिसते. हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग खूप कमी काळ टिकतो. तथापि, हेपेटायटीस बी आणि सी विषाणूंचा संसर्ग झाला तर तो अधिक वर्ष तग धरून राहू शकतो. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

हेपेटायटीस ए आणि ई यांचा संसर्ग कसा होतो ?

दूषित अन्नपदार्थांचं सेवन आणि अशुद्ध पाणी पिल्यामुळं अनेकांना हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग झाल्याचं पाहायला मिळतं. या आजारात पोटात दुखणं, मळमळ, उलट्या कावीळ, लघवी पिवळी होणं आणि थकवा जाणवणं अशी लक्षण दिसून येतात. हे दोन्ही संक्रमण अल्पकाळ टिकतात. साधारणपणे एक ते दोन आठवड्यात रुग्ण बरा होतो. महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांमध्ये हेपेटायटीस ई या आजारांचा संसर्ग होण्याचा धोका अधिक संभवतो. त्यामुळं या काळात महिलांना आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

हेपेटायटीस ए किंवा ई ची लागण झाली तर काय करावं ?

या आजारात विशेष असे उपचार उपलब्ध नाहीत. परंतु या विकाराची लागण झाली तर आपण घरगुती उपाय करू शकतो. याशिवाय संसर्गाचा धोका पूर्णत: बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या. अधिक काळ जर आजार टिकून राहिला तर रुग्णांना तातडीनं रुग्णालयात दाखल करा. कारण यकृतावर परिणाम झाला तर ते निकामी होण्याचा धोका असतो. अशावेळी वेळीच उपचार न झाल्यास यकृत प्रत्यारोपणशिवाय दुसरा पर्याय नसतो. वेळेवर जर प्रत्यारोपण झालं नाही तर रुग्णाच्या जीवावरही बेतू शकतं.

हेपेटायटीस बी मध्ये काय फरक आहे ?

हेपेटायटीस बी संसर्ग दीर्घकाळ यकृतात राहून यकृताला नुकसान पोहोचवतो. यामुळं यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. विशेष म्हणजे वीर्य, योनीमार्गातील द्रव आणि रक्तासारख्या शरीरातील द्रव्यांशी संपर्क आला तर व्यक्तीला हेपेटायटीस बी व्हायरसची लागण होऊ शकते. याशिवाय प्रसूतिदरम्यान, रक्त संक्रमणातून, असुरक्षित लैंगिक संबंध आणि आईपासून नवजात बाळाला हा आजार होऊ शकतो. त्यामुळं जर एखाद्याला हा संसर्ग झाला तर त्यानं लगेच यकृत तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.

इतर विषाणूंपेक्षा हेपेटायटीस सी घातक ठरतो का ?

या आजारात हेपेटायटीस बी सारखी लक्षणं असतात. परंतु हा आजार अधिक काळ टिकून राहतो. आणि हळूहळू यकृताला इजा होते. यामुळं यकृताचा सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. या आजारावर औषधोपचार उपलब्ध असून ही औषधं 3 ते 6 महिन्यात घ्यावी लागतात. हेपेटायटीस सी आजाराची लक्षणं ओळखणं आणि यकृताचे नुकसान होण्यापूर्वी तातडीनं निदान आणि उपचार करणं आवश्यक आहे.

हेपेटायटीस बी आणि सी ची लक्षणं –

1) भूक मंदावणं
2) अंगावरील त्वचा आणि डोळे पिवळे होणे (काविळ)
3) शौचाचा रंग फिकट आणि मुत्राचा रंग गडद असणं
4) पोटात दुखणं, सांधे दुखणं
5) थकवा, अचानक वजन कमी होणं
6) ताप, मळमळ, उलट्या

अशी घ्या काळजी

1) पौष्टीक आहाराचं सेवन आणि शुद्ध पाणी प्यावं.

2) शाळांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी असल्याची खात्री करून घ्या.

3) हेपेटायटीस ए या आजारावर लस उपलब्ध असून वयाच्या 1 वर्षांनंतर ही लस कोणीही घेऊ शकतो.

4) हेपेटायटीस बी आणि सी संसर्ग होऊ नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत.

5) हेपेटायटीस बीसाठी लस उपलब्ध असून जन्मानंतर ती बाळाला द्यावी लागते.

6) काविळची लागण झाल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा.

7) नियमित आरोग्य चाचणीत हेपेटायटीस बी आणि सी संसर्गाची लागण झालेली आहे का हे तपासून पहा.

8) नियमित आरोग्य चाचणीत हेपेटायटीस बी आणि सी संसर्गाची लागण झालेली आहे का हे तपासून पहा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.