यवतमाळ : तलवारीने केक कापून नाचगाणे करणार्‍या बर्थडे बॉयसह 5 जणांना अटक

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वाढदिवसाचा केक चक्क तलवारीने कापून नाच गाणे करीत गोंधळ घालणार्‍या बर्थ डे बॉयसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बर्थ डे बॉय कपिल काळबांडे, सिद्धार्थ काळबांडे, अजय काळबांडे, आकश काळबांडे व स्वप्नील काळबांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बिटरगांव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या सावळेश्वर येथे कपिल काळबांडे यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गाण्याच्या तालावर बेधुंदपणे नाचत असताना बर्थ डे बॉय कपिल याने घरातील तलवार आणून केक कापला. गाण्याच्या तालावर तलवार फिरवत सर्व जण नाचू लागले. काहींनी कपिल याला उचलून घेतले. साथीदारांच्या खाद्यांवर असताना कपिल हातात तलवार घेऊन ती हवेत फिरवत होता. हा व्हिडिओ व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाला. त्याची माहिती मिळताच पोलीस सावळेश्वर येथे पोहचले. त्यांनी तलवार जप्त करुन कपिल काळबांडे व त्याच्या ४ साथीदारांना अटक केली.

बिटरगांव पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.