गेनबिटकॉईनप्रमाणे कोल्हापूरात झीप कॉईन क्रिप्टो करन्सीत फसवणूक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यासह देशभरात गाजत असलेल्या गेनबिटकॉईन प्रमाणेच कोल्हापूरात झीप कॉईन क्रिप्टो करन्सी घोटाळा समोर असला आहे. या झीप कॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य सुत्रधार बालाजी गणगे याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी पुण्यातील निवासस्थानावर छापा टाकला आहे. याप्रकरणात आतापर्यंत फसवणूक झाल्याच्या दोन कोटी रुपयांच्या तक्रारी कोल्हापूर पोलिसांकडे दाखल झाल्या असून त्यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बालाजी गणगे, राजेंद्र नेर्लेकर आणि संजय कुंभार या तिघांना भागीदारीमध्ये कंपनी सुरु केली़ मुंबईतून या कंपनीची सुरुवात झाली़ त्यानंतर त्यांनी कोल्हापूरात आपला डेरा जमविला़ राजेंद्र नेर्लेकर हा ग्राहक आणत असत. तर त्याचा भाऊ अनिल आलेल्या रक्कमेचे आॅनलाईन व्यवहार करत असे. पुण्यातील गेनबिटकॉईन फसवणूकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन एक जण कोल्हापूर पोलिसांकडे आला, तेव्हा हा नवीन झीप कॉईन क्रिप्टो करन्सीचा घोटाळा समोर आला़ तक्रारदार व त्याच्या मित्राने यात २९ लाख रुपयांची गुंतवणुक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून संगणक व अन्य साहित्य जप्त केले आहे़ संगणकाचा पासवर्ड माहित नसल्याने त्यात नेमकी काय माहिती आहे, हे अद्याप पोलिसांसमोर आले नाही. पासवर्ड काढण्याचे काम सुरु आहे़ पोलीस सध्या राजेंद्र नेर्लेकर, त्याची पत्नी पद्मा आणि मुलाकडे चौकशी करीत आहे़ पोलिसांनी संशयितांचे बॅक खाती सील केली आहेत़ मुख्य सुत्रधार बालाजी गणगे याच्या पुण्यातील घरावर पोलिसांनी छापा टाकून झडती घेतली परंतु, तो मिळाला नाही.
झीप कॉईनमध्ये कोल्हापूर, सांगली,सातारा, पुण्यातील अनेक व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांनी या झीप कॉईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केली असल्याचा संशय असून फसवणूकीची रक्कम २५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.