झोमॅटोला वाढत्या पेट्रोलच्या किमतीचा फटका, डिलिव्हरी पार्टनर्सच्या पगारात करावी लागली वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांसह कंपन्यांवरही झाला आहे. या वाढत्या किमतीमुळेच आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने पे – स्ट्रक्चर सुधारित करण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या जास्त किंमतींमुळे कंपनी डिलिव्हरी पार्टनर्सना जास्त पैसे देईल. डिलिव्हरी पार्टनरने पगाराच्या वाढीबाबत देशभर केलेल्या संपानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यात म्हटले की, इंधनाचे दर त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करीत आहेत.

झोमॅटोने गुरुवारी सांगितले की, सुधारित पे- स्ट्रक्चरमध्ये लांब अंतरासाठीच्या पगाराचा एक अतिरिक्त घटक समावेश केला जाईल, ज्याला इंधन दरामध्ये होणाऱ्या बदलांसाठी अनुकूल असल्याचे मानले जाईल. ही रचना विद्यमान मोबदल्यावर लागू केली जाईल. इंधनाच्या किंमतीतील बदलांच्या आधारे हे समायोजित केले जाईल जेणेकरून डिलिव्हरी पार्टनर्सना फूड डिलिव्हरीसाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होऊ शकेल.

लांब पल्ल्याच्या डिलिव्हरी पार्टनर्सना मिळणार मदत
अहवालानुसार झोमॅटोने म्हंटले की, कंपनीने पाहिले की लांब पल्ल्यावर पेट्रोलच्या वाढत्या किंमतीचा अधिक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, अतिरिक्त देय दिल्यास लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी पार्टनर्सना लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. झोमॅटोचे सध्या दीड लाखाहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. तसेच, कंपनीने ही संख्या आणखी मजबूत करण्यासाठी योजना देखील आखली आहे. ज्याअंतर्गत 400 अधिक लोकांना कंपनीशी जोडले जाईल.