अंथरुणाला खिळलेल्या 90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार: आरोपीला जन्मठेप

कोल्हापूर: पोलीसनामा आॅनलाईन

अंथरुणाला खिळून असलेल्या एका नव्वद वर्षीय वृद्धेवर असहायतेचा गैरफायदा घेत, तिच्यावर अमानुषपणे लैगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

विष्णू नलावडे (वय 50) असे या नराधमाचे नाव आहे. तो भुदरगड तालुक्यातील नांगरवाडी येथे राहतो. 4 मार्च 2015 रोजी दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहून साडे अकरा ते साडेतीन या वेळेत आरोपी विष्णू याने 90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केला होता. अंथरुणावर पडून असलेल्या वृद्धेच्या असाहायतेचा फायदा घेत, अमानुषपणे अत्याचार केल्यानंतर विष्णू यास वृद्धेच्या शेजाऱ्यांनी पकडले होते. त्यावेळी नागरिकांनी त्याचा चोप देउन पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर गारगोटी पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बी. टी. बारवकर यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने कोर्टात नऊ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश आदिती कदम यांनी विष्णू नलवडे याला दोषी ठरवले होते.

आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश आदिती कदम यांनी या प्रकरणावर निकाल दिला आहे. आरोपी नलावडे याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ‘हा गुन्हा म्हणजे समाजासाठी मोठा धक्का आहे. अशा गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद आहे. मात्र तपासातील त्रुटींमुळे आरोपीला त्याचा फायदा मिळाला,’ असं निरीक्षण नोंदवितानाच आरोपीला शिक्षेत कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे सांगतानाच कोर्टाने त्याचा पॅरोलचा अर्जही फेटाळून लावला.