फुगा फेकल्याच्या वादातून तरुणावर चाकूने ५० वार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था
संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळत असताना दिल्लीत रंगाचा फुगा फेकल्याच्या क्षुल्लक भांडणात तरुणावर जीवघेणा हल्ला झाला.दक्षिण दिल्लीच्या खानपूर मध्ये २०-२५ जणांच्या टोळक्याने तरुणावर एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ५० वार केले. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आशिष असे या जखमीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आशिष गुरुवारी आपल्या घरासमोर उभा होता. दरम्यान तेथील एका लहान मुलाने बाईकवरून जाणाऱ्या युवकांवर पाण्याने भरलेला फुगा मारला. रागावलेल्या त्या बाईकस्वार तरुणाने लहान मुलांना मारहाण केली. यावेळी आशिषने मध्यस्ती करून युवकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. आशिषला धडा शिकवण्यासाठी शुक्रवारी १०-१२ दुचाकीवर आलेल्या २०-२५ जणांनी व्यायामावरून परतत असताना आशिषवर हल्ला केला. आशिषवर चाकूने आणि रॉडने हल्ला झाला. या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हाणामारीत मारहाण करणाऱ्यांनाही मार लागल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास सुरू आहे.