अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्षभर अत्याचार

विलेपार्ले : एका अल्पवयीन विद्यार्थिनीची चोरून काढलेली अश्लील चित्रफीत पसरवू (व्हायरल करू) अशी धमकी देत तब्बल वर्षभर परिसरातल्याच नऊ तरुणांनी शारीरिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. विलेपार्ले पोलिसांनी रविवारी यापैकी सहा तरुणांना अटक केली असून अटक आरोपींमध्ये एका माजी नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात, एकमेकांना ओळखतात. वर्षभरापूर्वी एका आरोपीने स्वत:च्या घरात याच मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग आरोपीच्या मित्राने आपल्या भ्रमणध्वनीत चोरून कैद केला. पुढे ही चित्रफीत त्या मुलीला दाखवण्यात आली. चित्रफीत सगळीकडे पसरवली गेली तर बदनामी होईल, आई-वडील तुला मारतील, सगळे हसतील, चिडवतील अशी भीती घालून दोघांनी त्या मुलीवर ते वारंवार अत्याचार करता राहिले.

ही चित्रफीत त्या दोघांकडून त्यांच्या अन्य सात मित्रांकडे, ओळखीतल्या तरुणांकडे पोहोचली. त्याचा फायदा घेत या सात जणांनीही या मुलीवर अत्याचार सुरू केले. सततच्या अत्याचारांमुळे मुलगी अबोल झाली, तिची प्रकृतीही खालावली. आपल्या मुलीत झालेले हे बदल तिच्या आईला जाणवले आणि तिने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. मुलीने आईला सर्व काही सांगितल्यानंतर तातडीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.