उथळपेठ येथील इको पार्कचे लोकार्पण मंगळवारी

चंद्रपूर : पोलिसनामा ऑनलाईन

अर्थ व वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्‍यातील उथळपेठ या आदर्श गावात निर्माण करण्‍यात आलेल्‍या इको पार्कचे लोकार्पण दिनांक 13 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00 होणार आहे.

अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतून यापूर्वी मूळ शहरात पंडीत दीनदयाल उपाध्‍याय इको पार्क, पोंभुर्णा शहरात भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क तयार करण्‍यात आले आहे. चंद्रपूर शहरात महामार्गावर भारतरत्‍न डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम निसर्ग उद्यान नागरिकांना खुले करण्‍यात आले आहे.
आता उथळपेठ या आदर्श गावात इको पार्क तयार करण्‍यात आले आहे. उथळपेठ या निसर्ग पर्यटन क्षेत्रात तयार करण्‍यात आलेल्‍या या इको पार्कचे लोकर्पण महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्‍या हस्‍ते होणार असून बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्‍याने चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्‍य वनसंरक्षक विजय शेळके, मुल नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, जि.प. सदस्‍य पृथ्‍वीराज अवताळे, मुल पंचायत समितीच्‍या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदु मारगोनवार, पंचायत समिती सदस्‍या वर्षा लोनबले, उथळपेठचे सरपंच रविंद्र सातपुते आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन समिती उथळपेठ आणि चंद्रपूर वनविभाग यांच्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.